Friday, August 14, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान २९

प्रतिक्रिया: 
“तू आपल्या सख्ख्या भावाचा खून केलास?” इन्स्पेक्टर राजेंनी महेशला विचारलं.

समीरवर कोर्टात खूनी हल्ला केल्यानंतर इन्स्पेक्टर राजेंनी महेशला ताब्यात घेतला होता. प्रियाची अर्थातच निर्दोष सुटका झाली होती आणि आता महेशवर केस स्टॅन्ड करण्यासाठी इन्स्पेक्टर राजे महेशचा जबाब नोंदवून घेत होते.

समीरवर कोर्टात खूनी हल्ला केल्यानंतर इन्स्पेक्टर राजेंनी महेशला ताब्यात घेतला होता. प्रियाची अर्थातच निर्दोष सुटका झाली होती आणि आता महेशवर केस स्टॅन्ड करण्यासाठी इन्स्पेक्टर राजे महेशचा जबाब नोंदवून घेत होते.

“सख्खा भाऊ? हं!” महेश उपहासाने हसला. “मनोज सख्खाच काय माझा भाऊच नव्हता. मनोजचे वडील जगदीशराव ठाकूर यांनी त्यांच्या बायकोला मूल होत नाही म्हणून मला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर मनोजचा जन्म झाला. मनोजच्या आईला माझ्याबद्दल कधीच आपुलकी वाटली नाही. घरात सतत वाद होऊ लागले. माझा मानसिक छळ होऊ लागला. मनोजच्या जन्मानंतर त्यात भरच पडली. शेवटी बाबांनी माझी दुसरीकडे सोय केली. मोठा झालो तेव्हाही त्या घरात रहाण्यापेक्षा स्वतंत्र घर घेऊन रहाणं मी पसंत केलं. मला वाटत होतं, बाबांना तरी माझ्याबद्दल आपुलकी असेल पण त्यांचं खरं रूप उघडं पडलं ते त्यांनी मृत्यूपत्र केलं त्या दिवशी! माझ्या वाटयाला दोन-तीन फुटकळ इन्व्हेस्टमेंट्स ठेवून बाकी सर्व इस्टेट त्यांनी मनोजच्या नावावर केली होती. म्हातारा मेला पण जाताना माझ्या हातात कवड्या देऊन गेला. त्याने मरण्याआधी एकच काम चांगलं केलं. त्याने मृत्यूपत्रात एक पॉईंट टाकला होता की जर मनोज काही कारणामुळे मेला तर मात्र त्याच्या वाटणीची सर्व इस्टेट माझ्या नावावर होणार होती. त्याच दिवशी ठरवलं की ह्या मनोजला रस्त्यातून बाजूला करेन तरच नावाचा महेश!

मला फक्त इतकंच पहायचं होतं की मनोजच्या खुनाचा आळ माझ्यावर येणार नाही किंवा काही असं कारण मिळालं पाहिजे ज्यामुळे मनोजचा खून आत्महत्या भासवता येईल. एक दिवस मला ती संधी मिळाली. मनोज प्रियाला प्रपोज करतो आणि प्रिया प्रत्येकवेळी नाही म्हणते ही गोष्ट मनोजच्या कॉलेजमधे प्रसिद्ध होती. त्यादिवशी मनोजने प्रियाला पुन्हा प्रपोज केलं आणि ती पुन्हा नाही म्हणाली. मला तेच हवं होतं. प्रियाला भेटून मनोज घरी येत असताना त्याला मी गाठलं. मुद्दामच प्रियाचा विषय काढला. तो विषय काढताच मनोज उदास झाला. त्याला पुन्हा मुडमधे आणण्यासाठी म्हणून मी माझ्या घरी न जाता त्याच्यासोबत बंगल्यावर गेलो. मनोजचं बेडरूम बंगल्याच्या मागच्या बाजूला आहे आणि मागच्या बाजूने ये-जा करण्यासाठी त्याला निराळा जिनाही आहे त्यामुळे मी मनोजबरोबर त्याच्या रूममधे गेलोय, हे मनोजशिवाय कुणालाच कळलं नाही.

गप्पांच्या ओघात मी मनोजला बरीच दारू पाजली होती. आता त्याच्यात उभं राहण्याचेही त्राण नव्हते. मी संधी साधून मनोजच्या गळ्याभोवती दोरीचा फास आवळला आणि त्याला फॅनला लटकवलं. त्याच्या गळ्याभोवती दोर इतका करकचून आवळलेला होता की त्याला मदतीसाठी ओरडताही आलं नाही. त्याला मरताना पाहून मला काही फार आनंद होत नव्हता पण त्याचं मरणं माझ्यासाठी गरजेचं होतं. पाच दहा मिनिटं तसाच तडफडत होता तो. मग हळूहळू त्याचे सर्व प्रयत्न थंडावले आणि त्याने मान टाकली. माझं काम संपलं होतं. आता मागच्या गुल् झालं की या कानाचं त्या कानाला कळणार नव्हतं. प्रियाने फसवलं म्हणून मनोजने आत्महत्या केली असं सगळीकडे पसरवलं की काम फत्ते!

पण माझा अंदाज चुकीचा निघाला. दिपकची मनोजवर असलेली खुन्नस त्याला मनोजच्या रुमपर्यंत आणेल हे मी गृहीतच धरलं नव्हतं. त्या दिवशी मनोजने प्रियाला पुन्हा प्रपोज केल्याची कुणकुण दिपकलाही लागली होती आणि मनोजला जाब विचारण्यासाठी म्हणून तो मनोजच्या रुमवर आला होता. मी मनोजचं प्रेत सिलिंग फॅनला लटकवेपर्यंतचा सर्व प्रकार त्याने आपल्या डोळयाने पाहिला होता. दिपकचं काम तमाम करायला मला वेळ लागला नसता पण मग मनोजच्या खुनाच्या तपासाला निराळी दिशा मिळाली असती आणि माझ्या पदरात अलगद पडणारं इस्टेटीचं दान धोक्यात आलं असतं.

मी दिपकला पैशाचं आमिष दाखवून माझ्याबाजूने वळवून घेतलं. एकदा का इस्टेट माझ्या नवावर झाली की त्याला आणखी पैसे देण्याचंही मी कबूल केलं. पण मनोजची केस निकालात निघाल्यावर दिपक मुंबईला गेला आणि परिस्थिती पालटली. दिपकने पैशाची मागणी केली. मी एक-दोनदा पैसे पाठवले पण एकदम मोठी रक्कम देणं मलाही शक्य होणार नव्हतं. मनोजच्या नावावर असलेली इस्टेट माझ्या नावावर होण्यास काही काळ लागणार होता. म्हणून मी मुंबईला येऊन दिपकला भेटलो. त्याच्यात बराच बदल झालेला दिसला. संधी मिळाली तर दिपक मला त्याच्या हातातलं बाहुलं बनवायला कमी करणार नाही हे मी समजून गेलो. दिपकचा काटा काढणं भाग झालं. पण कसं ते मला सुचत नव्हतं. मी विचार करत होतो.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment