Wednesday, August 5, 2009

गॉड ब्लेस यू... - पान १७

प्रतिक्रिया: 
“करच चौकशी. इथल्या बाराशे पंधराशेच्या नोकरीत काय ठेवलंय? तिकडे जाऊन पंधरा वीस हजार कमवायची संधी असताना....”

“दिपकची आई कॉल सेंटरचं नाव पत्ता देऊन गेली. मी माझ्या एका मैत्रीणीचं मत घेतलं तर तीसुद्धा म्हणाली की मुंबईला नोकरी करण्याची ही संधी सोडू नकोस. आई बाबा नकोच म्हणत होते पण मी कसंबसं त्यांना तयार केलं आणि मुंबईला आले. बाबांनी त्यांच्या एका मित्राकडे शब्द टाकला म्हणून त्या मित्राचा रिकामा फ्लॅट मला रहायला मिळाला.

कॉल इंडियामध्ये फ्रेशर्स आणि अस्खलित इंग्रजी बोलणार्यांरनाच नोकरी मिळत होती त्यामुळे मला नोकरी मिळणं फारसं कठीण गेलं नाही. मात्र ही गोष्ट खरी की मी माझ्या पूर्वायुष्याविषयीची माहिती ही नोकरी मिळवताना लपवून ठेवली. मला वाटलं न जाणो, मला नाशिकला नोकरी मिळवताना अडचणी आल्या तशा इथे आल्या तर? माझ्या सुदैवाने मला इंटरव्ह्य़ूमधेही फारशी पर्सनल माहिती विचारली गेली नाही.

कॉल सेंटरमधील दोन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर घरी जाण्यासाठी पहिल्यांदा ड्रॉप घेताना मला दिपकचीच गाडी मिळाली होती. त्याने मुद्दाम मला ’शेवटचा ड्रॉप चे,” असं सुचवलं. मलाही त्यात काही वावगं वाटलं नाही.

आफ्टर ऑल, आम्ही एकाच शहरातून आलो होतो, लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो. त्यादिवशी दिपक खूप नीट बोलत होता. नाशिकला असताना त्याच्या बोलण्यात जो थोडाफार मवालीपणा डोकवायचा, तोही जाणवत नव्हता.

परक्या शहरात ओळखीचा निदान एकतरी माणूस आहे, याचंच मला बरं वाटत होतं. त्यानंतर आठवडाभर मला वेगवेगळ्या गाडीने ड्रॉप मिळत होता आणि एक दिवस दिपकची गाडी माझ्या रूटवर फिक्स झाली, ती कायमचीच. हे साधारण तीन महिने व्यवस्थितपणे सुरू होतं. दिपकच गाडीवर आहे म्हटल्यावर मला शेवटचा ड्रॉप घेताना काही वावगं वाटत नसे.”

“पण ही परिस्थिती बदलली दिपकच्या वागण्यानेच. एक दिवस नेहमीप्रमाणे माझं घर आल्यावर मी गाडीतून उतरले, तर दिपकही माझ्या पाठोपाठ उतरला आणि अचानकपणे माझा हात आपल्या हातात पकडला.

“प्रिया...., खूप दिवस सांगावं असं होतं मनात पण संधीच मिळत नव्हती.”

मी हात सोडवून घेत म्हटलं, “जे काही बोलायचंय ते लांबून बोल. पुन्हा हात पकडलास तर...”

“तर काय? तुझ्या टी. एल. ला सांगशील? की त्या अमोल प्रभाकरला सांगशील?”

“ए, शहाणपणा दाखवू नकोस दिपक.” मी फणका-याने म्हणाले.

“शहाणपणा तू दाखवू नकोस, प्रिया. तुझं नाशिकचं लफडं जर तुझ्या ऑफिसमध्ये कळलं, तर पाच मिनिटांत नोकरी जाईल तुझी. ’तुझ्यावर एका माणसाच्या आत्महत्येमुळे केस झाली होती,’ एवढं एकच वाक्य सांगणं पुरेसं आहे तुला होत्याचं नव्हतं करायला.” दिपक छद्मी हसत म्हणाला.

“पण का करणार आहेस तू असं? मी काय घोडं मारलंय तुझं?”

“काहीच नाही. प्रिया, मुंबईत रहाणं सोपं नाही. पै पै खर्च करताना विचार करावा लागतो. आणि एका ड्रायव्हरचा पगार त्याच्या गरजा भागवताना अपुरा पडतो. तुझी माहीती सांगण्याचे पैसे नाही मिळणार मला पण न सांगण्याचे पैसे तर मी जरूर वसूल करू शकतो ना?”

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

3 comments:

  1. कथेमध्ये चांगलाच इंटरेस्ट येतो आहे.

    ReplyDelete
  2. मस्त.... उत्कंठा वाढतच चाललिय...!

    ReplyDelete
  3. Navin bhag lavkar post kara.

    ReplyDelete