Friday, August 14, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान २६

प्रतिक्रिया: 
“नाही. अजिबात शक्य नाही. खरं सांगायचं तर अशा प्रकारे चाकू मारण्याचा प्रयत्न केला तर चाकू बोटांवर घासल्यामुळे चाकू मारणा-याच्याच तळहाताला इजा होईल.”

“कोर्टाने आरोपीचे दोन्ही तळहात पहावेत अशी माझी नम्र विनंती आहे.”

प्रियाने आपल्या दोन्ही हातांचे पंजे समोर धरले. बसल्या जागेवरून लोकही माना वर करून प्रियाच्या हातांकडे पहात होते.

“युवर ऑनर, आपण पाहू शकता. आरोपीच्या उजव्याच काय पण डाव्या हाताच्या पंज्यावर आणि बोटांवरही कोणतीच जखम नाही.

हा खून जर प्रियाने केलेला असता तर सरकारी डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे चाकू धरण्याच्या पद्धतीमुळे तिच्या हातावर आणि बोटांवर जखम झाली असती. पण हा खून प्रियाने केलेलाच नाही आणि प्रियाने तो चाकू हातात धरला असला तरी तो खून करण्याच्या उद्देशाने धरला नव्हता तर आपले प्राण वाचविण्यासाठी तिने तो चाकू हातात घेऊन लांब फेकून दिला होता. मला आणखी एक गोष्ट कोर्टाच्या नजरेसमोर आणून द्याविशी वाटते, ती म्हणजे आरोपी डावखुरी आहे.”

ही गोष्ट खंदा-यांसाठीही नवीन होती पण त्यांना गप्प बसवेना.

“कदाचित.... कदाचित तिने कायद्याची दिशाभूल करण्यासाठी चाकू उजव्या हातात धरला असेल.” बॅ. खंदारे उभं रहात म्हणाले.

समीरने त्यांच्याकडे नुसतं पाहिलं आणि आपल्या विधानातला फोलपणा त्यांच्या लक्षात आला.

सराव नसलेल्या हाताने ’त्या’ विशिष्ट पद्धतीने चाकू हातात धरून जर मारण्याचा प्रयत्न केला असता तर प्रियाच्या बोटांना निश्चिततच जखम झाली असती.

समीरकडे पाहून ’कळलं कळलं’ अशा थाटात हात हलवत बॅ. खंदारे वेगाने खाली बसले. समीर पुन्हा प्रश्ने विचारण्यासाठी साक्षिदाराच्या पिंजर्याहजवळ गेला.

“डॉक्टर, चाकूच्या ज्या वाराने मयताला जखम होऊन रक्तस्त्राव झाला, तो वार किती ताकदीने करण्यात आला असावा?”

“पाठीचा भाग हा पोटापेक्षा कडक असतो त्यामुळे पोटापेक्षा पाठीत चाकू खुपसण्यासाठी जास्त ताकद वापरावी लागते. त्यात मयत व्यक्तीही दणकट प्रकृतीची आहे. त्यामुळे पाठीमधे अशा ठिकाणी चाकू पार मुठीपर्यंत खुपसायचा म्हटलं, तर चाकू मारणारी व्यक्तीसुद्धा ताकदवान असली पाहिजे.”

“जर आरोपीला आपण खुनी म्हणून गृहीत धरलं आणि दिलीप गुर्जरांनी सांगितलं तशा प्रकारे तिने चाकू पकडलेला असेल तर आरोपीला हा खून करता आला असता?”

“नाही, नाही. आरोपी अतिशय नाजूक प्रकृतीची स्त्री आहे. तिने कितीही जोरात असा वार करायचा म्हटलं तरी तिला शक्य होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी पोलिसांच्या खूप आधीच लक्षात यायला हवी होती, ती म्हणजे आरोपी लहानखु-या चणीची आहे. ती मयत व्यक्तीपेक्षा उंचीने कितीतरी बुटकी आहे. आरोपीने जर मयताच्या पाठीत चाकू खुपसला असता तर तिला तो हात उंच करून खुपसावा लागला असता आणि अशा प्रकारे चाकू मारला गेला असता तर तो मयताच्या पाठीमधे मुठीपर्यंत शिरणं अशक्यच होतं.”

“कदाचित मयत व्यक्ती जमिनीवर पडलेली असताना चाकू त्याच्या पाठीत खुपसला गेला असेल तर?”

“तर चाकूही निराळ्या पद्धतीने हातात धरावा लागला असता.”

“युवर ऑनर, सराकारी डॉक्टरांच्या साक्षिवरून हे सिद्ध होतंय की हा खून आरोपीने केलेला नाही.”

समीरचं वाक्य संपतं न्‍ संपतं तोच कोर्टात कुजबूज सुरू झाली.

“ऑर्डर, ऑर्डर. याच्यापुढे जर कोणी गडबड करून सरकारी कामकाजात व्यत्यय आणला तर मला नाईलाजाने सर्वांना बाहेर घालवून द्यावं लागेल.”

कोर्टात पुन्हा शांतता पसरली. समीरने सरकारी डॉक्टरांना जाण्याची परवानगी देताच ते कोर्टाला अभिवादन करून निघून गेले. बॅ. खंदारे डोकं धरून बसले होते. सरकारी वकिलांच्या विधानाने आरोपी निर्दोष सिद्ध होत होती.

“मि. खंदारे तुम्हाला आणखी काही साक्षिदार बोलवायचे आहेत?” जज्ज सिन्हांनी विचारलं.

“नाही. पण आरोपीच्या वकीलांनी त्यांचे साक्षिदार बोलावण्यापूर्वी मला आरोपीला काही प्रश्नव विचारायचे आहेत.”

समीरने परवानगी दर्शवताच बॅ. खंदारे प्रियाच्या स्टॅन्डजवळ गेले.

“मिस जगताप, तुम्ही स्टेटमेंटमधे असं म्हटलं आहे की दिपकपासून स्वत:ची सुट्का करून घेऊन तुम्ही पळालात आणि जेव्हा तुम्ही तुमची पर्स घेण्यासाठी पुन्हा मागे आलात तेव्हा तुम्हाला दिपकच्या पाठीत चाकू खुपसलेला दिसला.”

“हो. मी तसं स्टेटमेंट दिलंय.”

“तुम्ही दिपकपासून लांब पळणं आणि पुन्हा मागे येणं यात किती वेळ गेला असेल, हे सांगू शकाल का?”

“फार फार तर अर्धा मिनिट.”

“अर्धा मिनिट? युवर ऑनर, केवळ अर्ध्या मिनिटाच्या वेळात दिपकला जीवे मारणारी व्यक्ती आसपासच होती, तर त्या व्यक्तीने प्रियाला का मारलं नाही?” बॅ. खंदार्यां नी समीरला उद्देशून कोर्टासमोर प्रश्न केला.

“कारण त्या व्यक्तीने प्रियाला मारलं असतं, तर आज तुम्हाला प्रियाला हा प्रश्नण विचारण्याची संधी मिळाली नसती, खंदारेसाहेब.” समीरने मिश्किलपणे म्हटलं आणि कोर्टात हशा पिकला.

“युवर ऑनर, आरोपीचे वकील चेष्टेच्या मूडमधे दिसतात....”

“मी चेष्टेच्या मूडमधे नाही, युवर ऑनर. साधीशी गोष्ट आहे. खूनी व्यक्तीने प्रियाला जीवे मारलं असतं तर पोलिस खर्या् खुन्याच्या मागे लागले असते. प्रियाला जिवंत सोडल्यामुळेच आज खुनाचा आरोप प्रियावर आला आहे आणि खरा खूनी अजूनही अंधारातच आहे. युवर ऑनर, सरकारी वकिलांना माझ्या अशिलाला आणखी काही प्रश्न विचारायचे नसतील तर मी माझ्या साक्षिदारांना कॉल देतो. केस एका दिवसात सॉल्व्ह होईल. कारण खरा खुनी कोण आहे हे मला माहित आहे.”

जज्ज सिन्हांच्या हातोडा आपटण्याकडे दुर्लक्ष करून लोक आपापसात चर्चा करत राहिले. कोर्टात पुन्हा शांतता प्रस्थापित होण्यास दहा मिनिटे गेली.

“मि. सरदेसाई, तुम्हाला समजतंय ना, तुम्ही काय म्हणताय ते?”

“येस, युवर ऑनर. मी पूर्ण विचारांती हे विधान केलं आहे. वास्तविक पाहता सरकारी डॉक्टरांनी आपल्या साक्षित स्पष्टपणे जे म्हटलंय त्यावरून आरोपीने खून केलेला नाही, हे सिद्ध होतंय. पण खर्याप खुन्याला उजेडात आणून मी आरोपीच्या पूर्वायुष्याशी निगडीत असलेल्या केसचीही खरी बाजू उजेडात आणणार आहे.”

“यू मे प्रोसीड मि. सरदेसाई.”

“मि. महेश ठाकूर, टेक द स्टॅन्ड.” समीरने कॉल दिला.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

1 comment:

  1. hey....
    Khup mast lihitay.....
    waiting for the next post....

    ReplyDelete