Thursday, August 27, 2009

प्लॅन्चेट - पान २

प्रतिक्रिया: 
“बाहेर कुठे जायचंय, मम्मी?”

“अरे त्या समोरच्या घरात जायचंय आपल्याला. तो राहूलकाका आहे ना....”

“....आपल्या पल्लूआत्याचा मित्र?”

“मित्र नाही रे, आता तो तिचा नवरा होणार.”

“म्हणजे पल्लू आत्या लग्न करणार त्याच्याशी?”

“हो तर!”

“ए, असं कसं? पल्लू आत्या तर माझ्याशी लग्न करणारे.”

रितूने आधी चकित होऊन मनूकडे पाहिलं मग त्या वाक्याचा संदर्भ तिला लागल्यावर ती जोरजोरात हसत सुटली. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून राजेश आणि पल्लवी आपापल्या रुममधून बाहेर आले.

रितूला हसणं आवरत नव्हतं. राजेशने खुणेनेच “काय” असं विचारलं. रितू काही उत्तर देणार, एवढ्यात मनू धावत धावत पल्लवीकडे गेला. पल्लवीने त्याला उचलून घेतलं.

“ए आत्या, त्या दिवशी तू मला म्हणाली होती ना, की तू माझ्याशी लग्न करणार म्हणून. मग आता त्या राहूलकाकासोबत तू कसं लग्न करते?” मनूने फुरंगटून विचारलं.

पल्लवीला मागचा प्रसंग आठवला. राहूल आणि पल्लवीच्या लग्नाची बोलणी निश्‍चित झाल्यावर ’पल्लवी आता सासरी जाणार’ या विचाराने राजेश आणि रितूचे डोळे पाणावले होते. त्यांना रडताना पाहून मनूने पल्लवीच्या मागे “जाऊ नको” अशी भुणभुण सुरू केली होती. त्याची समजूत घालता येईना म्हणून राजेशने गमतीने म्हटलं होतं.

“बरं, मग ठीक आहे. आपण असं करू या. पल्लूआत्या मनुशी लग्न करेल म्हणजे तिला इथेच रहाता येईल.”

त्या निर्णयावर मनू इतका खूष झाला होता की घरभर नाचून त्याने हा आनंद व्यक्त केला आणि आता त्याची आई त्याला सांगत होती की पल्लूआत्या राहूलकाकाशी लग्न करणार.

“नाही बरं. मी तुझ्याशीच लग्न करीन हं.” पल्लवीने हसू दाबत समजावणीच्या सुरात म्हटलं.

“बघं, मी बोल्लो होतो ना तुला?” मनूने रितूकडे पहात म्हटलं आणि तो पल्लवीला आणखीनच बिलगला.

त्याच्याकडे पाहून राजेश, रितू आणि पल्लवी पुन्हा हसू लागले.

“देवा, ह्या घराला असंच हसतं-खेळतं ठेव रे, बाबा.”

रितू मनातल्या मनात प्रार्थना करत होती. जणू या सुखाला कुणाची नजर लागणार असल्याची कल्पना अंतर्मनाने तिला आधीच दिली होती.No comments:

Post a Comment