Tuesday, August 25, 2009

प्लॅन्चेट - पान १

प्रतिक्रिया: 
"मनू! किती वेळा सांगितलं तुला की त्या रूममधे जायचं नाही म्हणून?" रितू कडाडली.

"पण मम्मी...."

"पण नाही न् बिण नाही. आधी बाहेर ये."

रितूच्या या वाक्याबरोबर मनूचा नाईलाज झाला. आपले इवले इवले पाय जोररोरात आपटून त्याने राग व्यक्त केला आणि तो स्टोअर रूमच्या बाहेर आला. रितूच्या समोर उभं रहातानाही त्याच्या चेहे-यावरचा राग लपत नव्हता.

आपण मनुच्या अंगावर फारच जोरात ओरडलो, हे रितूच्या लक्षात आलं. तिने मनुला जवळ घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला.

"असं नई कलू लाजा. त्या रूमच्या दाराची आतली कडी दुरुस्त झाली ना, की मग तुला हवं तितका वेळ तू खेळ हं तिथे."

पण आज मनूचा राग नुसत्या जवळ घेऊन चुचकारण्याने जाणार नव्हता. रितूचा हात झिडकारून तो तसाच उभा राहिला. रागाने लाल लाल झालेले गोबरे गाल आणि नापसंती व्यक्त करण्यासाठी खालचा ओठ बाहेर काढलेला मनुचा चेहेरा इतका गोड दिसत होता की तो प्रतिकार करत असतानाही रितूने त्याला जवळ घेऊन कुरवाळलं. त्याची पापी घेतली.

"आईवर इतकं रागावतात का, सोनू? त्या रुमची कडी खराब झालीय की नई? जर दरवाजा बंद झाला आणि मनू तिकडे अडकून पडला तर आईला कित्ती रडू येईल?"

ही मात्रा बरोबर लागू पडली. आपल्याला काही झालं तर आईला खूप त्रास होतो, हे मनूला चांगलं माहित होतं. त्याने पट्कन रितूच्या गळ्याला मिठी मारली.

"सॉरी मम्मी. मी परत नाही एकटा जाणार."

"शहाणा आहे माझा राजा." रितूने पुन्हा त्याची पापी घेतली.

“मम्मी, तुला माहिती आहे का, त्या रूममधे काय काय गमती जमती आहेत?”

“नाही रे, काय आहे तिथे?”

“तिथे एक मोठ्ठा आरसा आहे, एक झोपाळ्यासारखी खुर्ची आहे....”

“हो? मला नाही बाई माहित. आपण नंतर पाहू या हं काय काय आहे तिथे ते. आता आपल्याला बाहेर जायचंय.” मनूला बोलण्यात गुंगवून रितूने त्याच्यासोबत जिना चढायला सुरूवात केली.


2 comments:

  1. Please post the next part

    ReplyDelete
  2. Abhijeet, sorry for the delay in reply. I have poste few more pages of the story . Do read it.

    ReplyDelete