Wednesday, August 12, 2009

गॉड ब्लेस यू... - पान २३

प्रतिक्रिया: 
“हो. जर दिपकला तो जिथे मेलेला सापडला तिथेच चाकू मारला गेलेला असता, तर चाकू मारल्यानंतर सुरूवातीच्या काही सेकंदात झालेली त्याची तडफड पावलांचे अस्ताव्यस्त ठसे ठेवून गेली असती. पण दिपकच्या पायांचे ठसे वाकडे तिकडे पडलेले असले तरी अस्ताव्यस्त नव्हते.

तसंच, प्रेत ज्या ठिकाणी होतं त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे त्या झाडीच्या आतल्या बाजूचाही चिखल बराच तुडवल्यासारखा दिसत होता. त्याही पुढे जाऊन मी तपासणी केली असता एका ठिकाणी मला अक्षरश: चिखलाचा राडा झालेला दिसला. त्यावरून असं दिसत होती की मयत दिपक बागवेची कोणाशी तरी झटापट झाली होती आणि जिथे चिखल तुडवल्यासारखा दिसत होता, तिथे त्याला चाकू मारण्यात आला होता आणि मग तो भेलकांडत गाडीच्या दिशेने पुढे आला.”

“गाडीमध्ये किंवा गाडीच्या बाहेर, इतरत्र तुम्हाला काय काय आढळलं?”

“खरं तर पाऊस इतका पडून गेला होता की सगळीकडे चिखलच चिखल झालेला दिसत होता. वाळलेली पानंही चिखलाबरोबर मिसळली होती. एखादी बारीकशी वस्तू असेल, तर सापडणं कठीण होतं. गाडीमध्ये मी आत्ता जे जे सापडलं म्हणून सांगितलं आहे, त्या व्यतिरिक्त काही मिळालं नाही.”

“गाडीत कुठे कुठे पाणी जमा झालेलं दिसलं तुम्हाला?”

“फक्त डिकीमध्ये.”

“आरोपीचं स्टेटमेंट घेतल्य़ावर तुम्ही तिला खुनाच्या जागी पुन्हा घेऊन गेला होतात का?”

“हो.”

“त्यावेळचं तिचं वागणं कसं होतं?”

“घाबरलेली दिसत होती. दिपक जिथे पडला होता ती जागा तिने बरोबर दाखवली.”

“दिपकच्या मोबाईल नंबरवरून त्याने शेवटचा फोन कुणाला केला, याचा तुम्ही ट्रेस घेतलात का?”

“आम्ही त्या नंबरवर फोन लावला होता पण फोन बंद आहे. फोन नंबरच्या मालकाचं नाव पत्ता शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ज्या व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड घेतलं गेलं आहे, ती व्यक्ती दोन वर्षांपूर्वीच मरण पावलेली आहे.”

“आय सी. कुठला होता पत्ता सिमकार्डसाठी?”

“नाशिकचा.”

“तुम्ही दिपकच्या कुटुंबियांकडे आणि मित्रपरिवाराकडे या नंबरची चौकशी केलीत?”

“येस सर. त्यांच्यापैकी हा नंबर कुणाचाच नाही.”

इन्स्पेक्टर राजेंच्या उत्तरामुळे कोर्टात कुजबूज सुरू झाली.

“थॅंक यू. दॅट्स ऑल युवर ऑनर.”

“तुमचा पुढचा साक्षिदार बोलावा, बॅ. खंदारे.” जज्ज सिन्हा.

“फिंगर प्रिंट एक्सपर्ट दिलीप गुर्जर.”

बॅ. खंदार्यां नी नाव पुकारलं आणि लोक सरसावून बसले. इन्स्पेक्टर राजेंच्या साक्षितून जे चित्र कोर्टासमोर उभं राहिलं होतं, त्यात आता हळूहळू रंग भरले जाणार होते. एक उंचापुरा पण किडकिडीत मनुष्य साक्षिदाराच्या पिंजर्याटत येऊन उभा राहिला. टक्क्ल पडल्यामुळे त्याचं वय जास्त वाटत होतं.

“मि. गुर्जर, तुम्ही फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट म्हणून या केसमधे सापडलेल्या सर्व फिंगर प्रिन्ट्स तपासल्या आहेत?”

“येस सर.”

“सापडलेले ठसे तुम्ही आरोपीच्या ठशांशी जुळवून पाहिलेत?”

“येस सर. सर्व नाही पण बरेचसे ठसे आरोपीच्या ठशांशी तंतोतंत जुळतात.”

“आरोपीचे ठसे कुठे कुठे मिळाले तुम्हाला?”

“कारमधे मागच्या भागावर आरोपीच्या हातांचे ठसे मिळाले. कारमधे सापडलेल्या लेडीज छत्रीच्या हॅन्डलवर, कारच्या मागच्या सीटवर, मागच्या दोन्ही दरवाजांच्या हॅन्डलवर, मागच्या दरवाज्याच्या वर कारच्या हूडचा भाग जिथे येतो तिथे आणि....”

“आणि....?”

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment