Friday, August 14, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान २५

प्रतिक्रिया: 
बॅ. खंदारे बसल्या जागी चुळबूळ करत होते. केस त्यांच्या हातातून जाण्याची लक्षणं दिसत होती. पण आता त्यांना काहीच करता येणं शक्य नव्हतं.

केसच्या सुरूवातीला त्यांनी एक दमदार प्रास्ताविक ठोकलं. पण तेवढंच ते. त्यानंतर त्यांनी केलेली प्रत्येक खेळी समीरच जिंकत गेला होता. आता तर केवळ उपचार म्हणून ते साक्षिदारांना बोलावणार होते.

“डॉ. प्रशांत सातपुते.”

“डॉ. सातपुते, सरकारी डॉक्टर म्हणून प्रेताचं पोस्टमार्टेम तुम्हीच केलंत?”

“हो.”

“काय आढळलं तुम्हाला पोस्टमार्टेममध्ये?”

“पाठीत खुपसलेल्या चाकूमुळे अति रक्तस्त्राव होऊन दिपकला मृत्यू आला होता.”

“मृत्यूची वेळ सांगता येईल?”

“पहाटे साडे तीन ते चारच्या दरम्यान.”

“थॅंक यू. क्रॉस.” बॅ खंदा-यांनी समीरला खूण केली.

समीर सावकाशपणे चालत साक्षिदाराच्या पिंजर्यांपाशी गेला.

“डॉ. सातपुते, मयताच्या पोस्टमार्टेमसंबंधीचे प्रश्न मी तुम्हाला नंतर विचारीन. मला आधी सांगा, सरकारी डॉक्टर म्हणून आरोपीची वैद्यकीय तपासणीही तुम्हीच केलीत?”

“हो.”

“काय आढळलं तुम्हाला तपासणीमधे?”

“आरोपीच्या नखांमधे आम्हाला मयताच्या त्वचेचे छोटे तुकडे अडकलेले मिळाले. तिच्या सॅंडलच्या हिलमधील खिळ्यात मयताच्या त्वचेचा एक छोटासा तुकडा अडकलेला मिळाला. तिचे जे कपडे तपासणीसाठी देण्यात आलेले होते, ते फाटलेले आणि चिखलाने बरबटलेले होते. आरोपीच्या डाव्या गालावर सूज होती आणि तो काळा निळा पडला होता. तिच्या गळ्यावरही हनुवटीच्या खालच्या बाजूला टोकदार वस्तूमुळे जखम झालेली होती. याव्यतिरिक्त आरोपीच्या मनगटावर, दंडावर, पायांवर व कमरेवर ब-याच खरचटल्याच्या खुणा होत्या. मात्र तिच्यावर बलात्कार झालेला नाही.”

डॉक्टरांचं उत्तर ऐकून झाल्यावर समीरने जज्ज सिन्हांकडे वळून म्हणाला, “युवर ऑनर सरकारी वकिलांनी आता जे काही सांगितलं आहे, त्यावरून हे सिद्ध होतंय की आरोपीने बलात्काराचा देखावा निर्माण केला नव्हता, तर तिच्यावर होऊ पहाणा-या बलात्काराला तिने सर्व ताकदीनीशी प्रतिकार केला होता.”

समीरने डॉक्टरांना पुढचा प्रश्नो विचारला.

ओ.के. डॉक्टर, आता मयताच्या पोस्टमार्टेमसंबंधी बोलू या. मयताच्या शरीरावर कुठे कुठे जखमा सापडल्या तुम्हाला?”

“मयताच्या पाठीवरच्या वारव्यतिरिक्त, त्याच्या गळ्यावर उजव्या बाजूला पात्याने झालेली जखम होती. शिवाय त्याच्या दोन्ही गालांवर जखमा होत्या. मयताचा उजवा गाल कशाला तरी टरकावून फाडून निघाला होता आणि त्याच्या डाव्या गालावर नखांचे ओरखडे होते. याव्यतिरिक्त मयताच्या अंगावर एक दोन ठिकाणी झटापटीतून झालेल्या जखमा होत्या.

“या सर्व जखमांमधील कोणती जखम प्राणघातक होती?”

“मी मघाशीच सांगितलं की पाठीत खुपसलेल्या चाकूमुळे अति रक्तस्त्राव होऊन दिपकला मृत्यू आला. म्हणजेच पाठीत खुपसलेल्या चाकूने झालेली जखम ही प्राणघातक होती.”

“मग मयताच्या गळ्यात खुपसलेल्या त्या पात्याचं काय?”

“त्या पात्याच्या वाराने मयताला जखम जरूर झाली पण रक्तस्त्राव होऊन प्राण जावेत इतकी मोठी जखम नव्हती ती.”

“तुमच्याआधी सकाळच्या सेशनमधे फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट दिलीप गुर्जर साक्ष देऊन गेले. ती साक्ष ऐकली होतीत तुम्ही?”

“नाही.”

“ऑलराईट. मी, रिडरला दिलीप गुर्जरांना मी विचारलेले प्रश्न आणि गुर्जरांनी दिलेली त्या प्रश्नांलची उत्तरं वाचून दाखवायला सांगतो. कृपया ती लक्षपूर्वक ऐका. मी त्यानंतर तुम्हाला प्रश्नल विचारेन. इज धिस ओ.के.?”

“नो प्रॉब्लेम अॅाट ऑल.”

समीरने रिडरला दिलीप गुर्जरांच्या साक्षिमधला ठराविक भाग वाचून दाखवायला सांगितला. वाचता वाचता रिडर एका वाक्यापाशी आला आणि समीरने त्याला थांबायची खूण केली.

“डॉक्टर, आता रिडर जे वाचणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला प्रश्नव विचारेन.”

“ओ.के.” डॉक्टर म्हणाले. समीर काय विचारणार आहे हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. ते मंद मंद हसत होते.

समीरने खूण करताच रिडरने प्रश्नि वाचून दाखवण्यास सुरूवात केली.

“सरदेसाईंनी दिलीप गुर्जरांना म्हटलं, “तुम्हाला जर इतकी खात्री असेल, तर तुमच्या ज्ञानाला मी आव्हान देऊ शकत नाही, मि. गुर्जर. पण मला एक सांगा, तुम्ही जी ठशांची पोझिशन सांगताय त्यानुसार आरोपीने तो चाकू आपल्या उजव्या हातात धरला होता आणि पात्याचा धार असलेला थोडासा भाग तिच्या करंगळी आणि अनामिकेने झाकला गेला होता. बरोबर?” यावर दिलीप गुर्जर म्हणाले, “अगदी बरोबर.”

रिडरने प्रश्न आणि उत्तर वाचून दाखवल्यावर समीरने आपला मोर्चा पुन्हा डॉक्टरांकडे वळवला.

“हं, डॉक्टर, आता तुम्ही मला सांगा, दिलीप गुर्जरांनी सांगितलेल्या प्रकारे चाकू हातात धरून तो कुणाच्या पाठीत खुपसणं शक्य आहे का?”

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment