Wednesday, August 12, 2009

गॉड ब्लेस यू... - पान २२

प्रतिक्रिया: 
“इन्स्पेक्टर चंद्रकांत राजे.”

नाव पुकारताच एक रुबाबदार इन्स्पेक्टर खाड खाड बूट वाजवत साक्षिदाराच्या पिंज-यात येऊन उभा राहिला. शपथ घेणं हे जणू रोजचंच काम आहे, अशा थाटात त्याने शपथ घेतली. बॅ. खंदारे प्रश्न विचारण्यासाठी इन्स्पेक्टरकडे वळले.

“इन्स्पेक्टर राजे, खुनाची बातमी तुम्हाला किती वाजता समजली?”

“२५ ऑगस्टच्या पहाटे माझ्या घड्याळात एक्झॅटली चार वाजून पंचावन्न मिनीटे झाली असताना मला आमच्या हेडक्वॅर्टरमधून ह्या खुनाच्या संदर्भात फोन आला आणि मी वीस-पंचवीस मिनिटांत माझा ग्रुप घेऊन खुनाच्या जागी पोहोचलो.”

“खुनाच्या जागी तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला कशी आणि काय काय माहिती मिळाली ते कोर्टाला स्पष्ट करून सांगा.”

इन्स्पे. राजे घसा साफ करत म्हणाले, “आम्ही बॅटरीवर चालणारे दिवे घेऊन गेलो होतो. त्या उजेडात दृश्य व्यवस्थित दिसत होतं. गवत, झाडांचा पालापाचोळा, माती आणि पाणी यांचं मिश्रण होऊन जो चिखल तयार झाला होता त्यात एक दणकट प्रकृतीचा मनुष्य पालथा पडलेला होता. त्याचं तोंड आमच्या म्हणजे रस्त्याच्या दिशेने वळलेलं होतं. त्याच्या पाठीतून मधोमध एका चाकूची मूठ बाहेर आलेली दिसत होती. पाठीतून उजव्या बाजूने बरंच रक्त वाहून गेलेलं दिसत होतं. त्या मनुष्याला मरून एक तास तर नक्कीच झाला असावा. त्याच्या जवळ काही अंतरावर एक टाटा इंडिका उभी होती. गाडीचे हेडलाईट सुरूच होते. ड्रायव्हिंग सीटशेजारचा दरवाजा सोडून इतर तीनही दरवाजे उघडे होते. गाडीत आम्हाला एक लेडीज छत्री, एक सिगारेटचा बॉक्स आणि एक मोबाईल सापडला. गाडीच्या डिकीत मला एक टायर सापडला आणि थोडं पाणीही शिरलं होतं डिकिमध्ये.

मृत व्यक्तीच्या शरीरावरील कपडे तपासले असता मला त्याचं आय कार्ड मिळालं. त्यावरून मिळालेल्या फोन नंबरवरून मी प्राईम ट्रान्सपोर्टच्या मॅनेजरना फोन लावून मृताची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं.

प्रेताच्या आजूबाजूचा बराच चिखल तुडवल्यासारखा दिसत होता. पावलांचे ठसे होते पण गवत आणि पालापाचोळ्यामुळे मातीत जसे ठसे मिळतात तसे हे ठसे नव्हते. इतकंच समजत होतं की ते पावलांचे ठसे आहेत. मात्र पावलांच्या ठशांवरून असं वाटत होतं की दिपकला चाकू निराळ्याच ठिकाणी मारला गेला असावा आणि आपला जीव वाचविण्यासाठी तो गाडीच्या दिशेने येत असताना कोसळला व तिथेच त्याचा प्राण गेला असावा. प्रेताच्या मानेमध्ये उजव्या बाजूला मला बोटाच्या पहिल्या पेराएवढया लांबीचं एक पातं खुपसलेलं दिसलं. त्याच्यावर ’गॉड ब्लेस यू’ अशी इंग्रजी अक्षरे कोरलेली होती. आरोपीने ते पातं तिच्या लॉकेटमधीळ असल्याचं कबूल केलं आहे. मी पंचनामा करून फोटोग्राफर मनिष टाकळे आणि फिंगर प्रिंट एक्सपर्ट दिलीप गुर्जर यांना त्यांच्या कामाला सुरूवात करायला सांगितली. गाडीत सापडलेल्या मोबाईलच्या बॅकवर प्राईम ट्रान्सपोर्टचा स्टीकर होता आणि डी. बी. अशी इनिशिअल्स चिकटवलेली दिसत होती.”

“व्हेरी गुड ऑब्झर्वेशन, इन्स्पेक्टर. आता मला सांगा, आरोपी कुठे सापडली तुम्हाला?”

“सापडली नाही. ती स्वत:च पोलिस स्टेशनला हजर झाली होती.”

“कधी हजर झाली होती ती?”

“खुनाच्याच दिवशी पहाटे साडेपाच वाजता.”

“पण त्यावेळी तर तुम्ही खुनाच्या स्पॉटवर होतात ना?”

“हो. मला आमच्या पोलिस स्टेशनमधून फोन आला की एक तरूणी पोलिस स्टेशनला आली आहे आणि खुनाची बातमी देत आहे.”

“मग तुम्ही काय केलंत?”

“मी पोलिस स्टेशनला थांबलेल्या सब-इन्स्पे. भारकुटेंना तिचं स्टेटमेंट लिहून घ्यायला सांगितलं आणि तिला तिथेच थांबवून ठेवायला सांगितलं.”

“क्रॉस एक्झामिन.”

समीर एक एक पाऊल मोजत गेल्यासारखा त्यांच्याजवळ गेला. जणू एक एक प्रश्नि त्याला मोजून मापून विचारायचा होता.

“इन्स्पे. राजे, प्रेताच्या आजूबाजूचा मिळालेल्या पावलांच्या ठशांवरून तुम्ही जो अंदाज बांधलात की दिपकला चाकू मारल्यानंतर तो त्या जागी येऊन पडला असावा, त्याला काही कारण आहे का?”

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment