Monday, August 10, 2009

गॉड ब्लेस यू... - पान १८

प्रतिक्रिया: 
“अस्सं. म्हणजे तू मला ब्लॅकमेल करतोयंस तर....”

“किती समजूतदार आहेस तू!”

“दिपक, मीही तुझ्याचसारखी मध्यमवर्गीय मुलगी आहे. तुला देण्याइतके पैसे माझ्याकडे असते, तर माझ्या वडीलांच्या कर्ज नसतं का फेडलं मी?”

“तो विचार करणं माझं काम नाही प्रिया. आणि काळजी नको करूस. तुझी ऐपत पाहूनच मी पैसा मागणार आहे. तुझा पगार किती? अठरा हजार ना? चल, दरमहा त्यातले दहा हजार देत जा मला.”

“मला शक्य नाही. तुला माहितीय मी ....”

“ते जमत नसेल, तर एक रात्र माझ्याबरोबर काढ.”

“व्हॉट?...तुझं डोकं फिरलंय काय?”

“बघ, राग आला ना? मला पण असाच राग येतो माझ्या परिस्थितीचा. मग....देशील ना, दरमहा दहा हजार फक्त?”

“मी होकार दिला. मला त्यावेळी दुसरा पर्यायच सापडत नव्हता. घरी गेल्यावर मी बराच वेळ विचार करत बसले होते. एक विचार मनात आला की अशीच नोकरी सोडावी आणि सरळ नाशिकला परत निघून जावं. मग म्हटलं आपण मुंबईला आलो ते बाबांचं कर्ज फेडण्यासाठी पैसे कमवायला, मग असंच हात हलवत परत जायचं?

ही राहती जागा सोडून दुसरीकडे जागा पहावी असाही विचार मनात आला पण ते परवडलही नसतं. बाबांच्या ओळखीमुळे त्यांच्या मित्राने फुकटात रहाण्यासाठी त्याचा रिकामा फ्लॅट दिला होता. शिवाय मुंबईत येऊन सहा महिने झाले तरी मला मुंबईची फारशी माहितीही नव्हती. आहे ती नोकरी सांभाळून जिथे दिपकशी संबंधच येणार नाही अशी दुसरी नोकरी शोधावी लागणार होती. पण तोपर्यंत मला वेळ हवा होता म्हणून दिपकच्या म्हणण्यानुसार त्याला दरमहा दहा हजार द्यायचं मी ठरवलं.

मात्र माझ्या मनातील खळबळ फार दिवस लपून राहिली नाही. एक दिवस मी हाफ-डे घेऊन आमच्या ऑफिसच्या मेडिकल रूममध्ये झोपले असताना मला अमोल प्रभाकर भेटायला आला.

ट्रेनिंग पिरियडमध्ये अमोलने मला खूप मदत केली होती. आठवड्याभरातच त्याची आणि माझी वेव्हलेंग्थ जुळली होती आणि योगायोगाने मला त्याच्याच प्रोसेसला टाकलं होतं. त्याचं घर माझ्याच रूटवर असल्याने घरी जातानाही आम्ही एकाच गाडीत बसायचो. ऑफिसमध्ये लॉगआऊट होईपर्यंत बोलता यायचं नाही म्हणून आम्ही घरी जाता जाता गप्पा मारायचो.

ब्लॅकमेलिंगच्या प्रसंगाने नंतरच्या दोन-तीन दिवसात माझं कामावरून तर लक्ष उडालंच होतं पण मला कोणाशी मोकळेपणी बोलतानाही चोरट्यासारखं व्हायला लागलं. अमोलच्या ते लक्षात आलं होतं. त्याने घरी जाताना गाडीत बसल्याव्र कारण विचारण्याचा प्रयत्न केला पण ’बरं वाटत नाहीये’ असं म्हणून मी त्याला टाळलं. दिपकच्या ब्लॅकमेलींगचं मला इतकं टेन्शन आलं की एक दिवस मी कॉल्स घेतानाही बोलताना अडखळायला लागले. मी त्या दिवशी टी. एल. ला सांगून हाफ डे टाकला आणि मेडीकल रूममधे जाऊन झोपले. अमोलने ते पाहिलं असावं बहुधा. कारण तो थोड्या वेळातच मेडीकल रूममधे आला आणि मला खोदून खोदून विचारायला लागला.

शेवटी मी त्याला घडला प्रकार सांगितला तसा तो खूप चिडला. “असं काही ऑफिसमध्ये कळलं तर काही होत नाही”, असं त्याने मला सांगितलं. मलाही थोडा धीर आला त्याचं बोलणं ऐकून. त्याचं बोलणं इतकं आश्वा”सक होतं की मी माझ्याही नकळत बोलून गेले. “अमोल, तुझ्यासारखा लाईफ पार्टनर ज्या मुलीला लाभेल, ती मुलगी भाग्यवान असेल.”

ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment