Saturday, August 1, 2009

गॉड ब्लेस यू... - पान १०

प्रतिक्रिया: 
“माझा पहिला साक्षिदार आहे, विठ्ठल नाईक.”

पांढराशुभ्र लेंगा आणि नेहरू शर्ट घातलेला एक तीस-पस्तीशीचा इसम पिंज-यात येऊन उभा राहिला. त्याने शपथ घेतली आणि बॅ. खंदारे प्रश्न विचारण्यासाठी त्याच्याकडे वळले.

“विठ्ठल नाईक, २५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता बेल्वेकर वाडीच्या मागे असलेल्या गर्द रानात जो खून झाला त्याची वर्दी तुम्ही पोलिसांना दिली होतीत?”

“होय साहेब.”

“तुम्हाला कसं कळलं की तिथे खून झाला आहे?”

ट्रान्समधे गेल्यावर जशी तिरकी मान करतात, तशी तिरकी मान करून वर गरगर फिरणा-या पंख्याकडे पहात विठ्ठलने सुरूवात केली.

“माझा दुधाचा धंदा आहे. २५ ऑगस्टच्या पहाटे साडेचार वाजता मी नेहमीप्रमाणे दुधाच्या पिशव्यांचे क्रेट्स घेऊन माझ्या स्कूटरवरून चाललो होतो. बेल्वेकर वाडीला लागून जो रस्ता आहे, तिथे आल्यावर माझी स्कूटर मला स्लो कारावी लागली. तो रस्ता अपघातासाठी प्रसिद्धच आहे. दर आठवड्याला तिथे एक ना एक अपघात होतोच. त्या रस्त्यावरून जाताना दुचाकी वाहन तर खूप सावकाश चालवावं लागतं. त्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडून गेलेला. म्हणून मी अगदी सावकाश चाललो होतो. सहज म्हणून माझं लक्ष रस्त्याच्या उजवीकडे गेलं तर मला आत झाडीत थोडा उजेड दिसला.

मला वाटलं एखाद्या गाडीला अपघातच झालाय की काय? म्हटलं कोण जखमी माणूस असेल तर त्याला मदत करावी. म्हणू्न स्कूटर झाडाच्या कडेला लाऊन मी आत शिरलो. मला वाटलं तशी एक गाडी होतीच तिथे आणि समोरच मला एका पुरूषाची डेड बॉडी दिसली.”

“तुम्हाला कसं कळलं की तो पुरूष मेलेला आहे?” बॅ. खंदा-यांनी विचारलं.

“आता आहे का? अहो, त्या पुरूषाची मान एका बाजूला कलती झालती, डोळे सताड उघडे, चिखलाची पर्वा न करता जमिनीवर पालथा पडलेला आणि त्याच्या पाठीतून एक चाकूची मुठ बाहेर आलेली दिसत होती. तिथून रक्त व्हायलेलं दिसत होतं. आता त्याला जिता म्हणायचा का मुडदा?

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment