Saturday, July 25, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ८

प्रतिक्रिया: 
दिपकने आपल्याला निराळ्याच ठिकाणी आणलेलं पाहून प्रिया चिडली. प्रिया व दिपकमध्ये वाद सुरू झाला. वाद हळूहळू वाढत त्याचं रुपांतर भांडणात झालं. रागाच्या भरात दिपक बोलून गेला की इतके दिवस त्याने तोंड बंद ठेवलं पण जर प्रियाने त्याला फसवलं तर तो तिच्या नाशिकच्या केसची बातमी तिच्या ऑफिसमधे सर्वांना सांगेल आणि तिची नोकरी घालवेल. हे ऐकताच प्रिया रागाने कारच्या बाहेर पडली.

दिपकला बोललेल्या गोष्टीचा पश्चा्ताप झाला म्हणून तिच्या पाठोपाठ तिला समजावण्यासाठी तोही बाहेर पडला. पण आता प्रिया काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. दिपकने तोंड उघडलं तर उद्या आपल्याला कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल याची प्रियाला कल्पना आली म्हणून प्रियाने त्याला धमकावण्यासाठी आपल्या पर्समधील चाकू काढला.

चाकू पाहून दिपक घाबरला आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तो प्रियापासून दूर पळू लागला. पण आज जर दिपक जिवंत सुटला तर उद्या तो आपल्या नाशिकच्या केसची बातमी ऑफिसमध्ये सांगेल. त्यामुळे आपली नोकरी गेली तर आपली मुंबईतील मजाही संपेल या विचाराने प्रियाने दिपकला गाठलं आणि हातातला चाकू त्याच्या पाठीत खुपसला.

त्यानंतर बलात्काराचा देखावा निर्माण करून आरोपी तेथून पळून गेली. जाण्याआधी आपल्या निरपराध असण्याचा पुरावा म्हणून ती आपल्या लॉकेटमधील ब्लेड दिपकच्या मानेत खुपसायला विसरली नाही.”

“ही दिपक बागवेच्या खुनाची पार्श्वेभूमी आहे, युवर ऑनर. आता माझ्या विधानांना बळकटी देण्यासाठी मी माझे साक्षिदार बोलावणार आहे पण त्यापूर्वी आरोपीचे वकिल बॅ. समीर सरदेसाई यांना काही कमेंट्स करायच्या असतील तर त्यांनी त्या जरूर कराव्यात.”

“आरोपीच्या वकिलांना काही बोलायचं आहे?” जज्ज सिन्हांनी समीरकडे पहात विचारलं.

“येस युवर ऑनर,” म्हणत समीर आपल्या जागेवरून उठला. उठताक्षणी त्याची सहा फूट उंची नजरेत भरत होती. त्याच्या डोळ्यांमधील शांत भाव कोणत्याही व्यक्तिला दिलासा देणारे होते. चेहेर्यालवरचं हास्य त्याच्या मिश्किलपणाची साक्ष देत होतं.

कोर्टाला अभिवादन करून समीरने बॅ. खंदा-यांकडे पाहिलं. खंदारे समीरकडे पाहून पुन्हा तुच्छपणे हसले. साहजिकच होतं ते. समीर नवखा वकील होता. खंदा-यांसारख्या मुरलेल्या वकीलासमोर त्याचा पाडाव लागणं कठीण होतं पण समीरच्या बाजूने दोन गोष्टी जमेच्या होत्या. एक म्हणजे त्याचा आत्मविश्वांस आणि दुसरी परिस्थितीचं योग्य मूल्यमापन करण्याची योग्यता. चेहेर्याचवरचं मिश्किल हास्य कायम ठेवून समीरने बोलायला सुरुवात केली.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

3 comments:

 1. ...... वा! उत्कंठा अगदीच शिगेला पोहोचलीय....!

  ReplyDelete
 2. पुढचा भाग लिहा लवकर...

  ReplyDelete
 3. भुंगा, alhadmahabal,
  आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.

  ReplyDelete