Friday, July 24, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ४

प्रतिक्रिया: 
दिपक मान आवळत तिच्या शरिरावरून बाजूला झाला. प्रिया आपला स्कर्ट सावरत उठली. बाजूला कण्हत पडलेल्या दिपकच्या पोटात तिने एक जोरदार लाथ मारली. तो कळवळला. प्रियाने चोहिकडे पाहिलं. तिला तिथून बाहेर पडायचं होतं.

पावसाच्या मा-यामुळे, त्या अनोळखी रानात तिला सर्व दिशा सारख्याच वाटत होत्या. मग तिच्या लक्षात आलं, ‘ज्या दिशेने दिपकने ह्या जंगलात कार आणली, तो रस्ता नक्की कुठे ना कुठे तरी मेन रोडवर निघत असणार.’ मात्र ती दिशा नक्की कोणती, हे तिलाही ठरवता येत नव्हतं. पण इथे थांबून ह्या नराधमाचं सावज बनण्यापेक्षा एखाद्या जंगली श्वापदाचं भक्ष्य बनणं चांगलं, असा विचार करून प्रियाने एक दिशा निश्चित केली आणि पळायला सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर तिला कारचे हेडलाईट दिसले.

"म्हणजे आपली दिशा योग्य आहे तर!"

प्रियाने आपल्या पळण्याचा वेग वाढवला. कारला क्रॉस करून ती पुढे गेली आणि पळता पळता ती जागच्या जागी थबकली.

“पर्स....!”

तिची पर्स कारमधेच राहिली होती! ती पुन्हा पळत कारजवळ गेली. पर्स घेऊन प्रियाने कारच्या बाहेर डोकं काढलं तर समोरून दिपक तिच्या दिशेने येताना तिला दिसला. त्याला पाहूनच प्रियाच्या काळजाचा ठोका चुकला. भेलकांडत, पडत तो तिच्या दिशेने हातभर अंतरावर येऊन पोहोचला तरी तिला पळायचंही सुचेना. विस्फारलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहात असतानाच, तिच्या दिशेने हात पुढे करत तो खाली कोसळला.

त्याच वेळी विजेचा एक लोळ कडाड्कन चमकून गेला. दिपकच्या पाठीत खुपसलेल्या चाकूची मूठ त्या विजेच्या प्रकाशात प्रियाला स्पष्ट दिसली होती. तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली.

“चाकू....? चाकू तर आपणच लांब फेकून दिला होता ना...? मग...?”

भीतीने तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने एक आंवढा गिळला. आजूबाजूला पहाण्याचंही धाडस तिला होत नव्हतं. कसंबसं स्वत:ला सावरत, त्या रानातून बाहेर पडण्यासाठी ती पुन्हा मागे वळली. चिखलात धडपडत, वाटेत येणा-या काटेरी झुडुपांनी स्वतःला ओरबाडून घेत, त्या आडरानातून वाट काढत, प्रिया मेन रोडवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होती....

'गॉड ब्लेस यू...' ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

5 comments:

 1. मस्तच. तुमची दुसरी कथाही वाचली. फारच छान लिहिले आहे. जास्त ड्रमेटिक प्रसंग नसतानाही ती पुढे वाचवीशी वाटत जाते. कृपया लिहीत रहा. तुमच्या लिखणा साठी हार्दिक शुभेच्छा

  ReplyDelete
 2. Pravin, आपल्या प्रोत्साहनात्मक अभिप्रायासाठी आभारी आहे.

  ReplyDelete
 3. माझ्या ब्लॉग वर प्रतिक्रिया दिल्याने तुझ्या ब्लॉगचा पत्ता कळला.. :D मस्त गं. अजून सगळे वाचलेले नाही पण आता वाचीन लवकरच... अशीच लिहित रहा. .. शुभेच्छा ... !

  ReplyDelete
 4. धन्यवाद, रोहन. तुही खाण्याबद्दल लिहीत रहा म्हणजे मलाही बरं. शेवटी खाणार तर लिहीणार!

  ReplyDelete
 5. स्टोरी लवकर लवकर पोस्ट करा. खुनी कोण हे माहित करून घेण्याची खूप उत्सुकता वाटत आहे.

  ReplyDelete