Tuesday, July 21, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान १

प्रतिक्रिया: 
पाउस धो धो पडतच होता. काचेवर आपटणारं पावसाचं पाणी वायपरने सपसप् कापत कार पुढे चालली होती. मुसळधार पाऊस आणि रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्याला फारशी वाहने नव्हती. मध्येच एखादा विजेचा लोळ चमकून जायचा आणि त्या प्रकाशात रस्ता उजळून निघायचा. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे पाणी आत आलं नव्हतं पण प्रियाला कारच्या आतही गारवा जाणवत होता. केव्हा एकदा घरी जाते आणि बिछान्यावर अंग टाकते असं तिला झालं होतं.

नाईट शिफ़्टला शेवटचा ड्रॉप घेणं तिला जिवावर यायचं पण तिचा नाईलाज होता. खरंतर हा कॉल सेंटरचा जॉब करण्याचीही तिची अजिबात इच्छा नव्हती. घरातल्या आर्थिक ओढग्रस्तीला थोपवण्याचा एकमेव उपाय म्हणून तिने हा पर्याय निमूटपणे स्विकारला होता. त्यासाठी ती नाशिक सोडून मुंबईला आली होती. तिचं नशीब, की तिला होस्टेलच्या वातावरणात राहावं लागत नव्हतं. वडिलांच्या मित्राच्या रिकाम्या फ्लॅटवर राहण्याची परवानगी मिळाली होती. तिही फुकट! शिवाय कामाला जाण्या-येण्यासाठी कॉल सेंटरची गाडी असायची. त्यामुळे ब-यापैकी पैसे वाचायचे.

“आणखी दोन वर्षं! एकदा का बाबांचं कर्ज फिटलं, की नको ती नाईट शिफ्ट आणि नको ते कॉल सेंटर! कोणताही डे शिफ्टचा, अगदी पाच-सहा हजाराचा जॉबही आपल्याला चालेल.”

झोपेच्य अंमलातही वडीलांच्या कर्जाचा विचार काही प्रियाच्या डोक्यातून जात नव्हता. ड्रॉपची गाडी एका जागी थांबली. तिने जडावलेले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या डोळ्यावरची झोप काही केल्या हटायला तयार नव्हती. इतक्यात मागचा दरवाजा उघडून कुणीतरी आत आल्याची चाहूल प्रियाला लागली आणि ती एकदम सावध झाली. मान वळवून पाहिलं तर गाडीचा ड्रायव्हर दिपक तिच्या बाजूला येऊन बसला होता. त्याचा हात तिच्याच दिशेने येत होता. प्रतिक्षिप्त क्रियेने प्रियाचे दोन्ही हात झटकले गेले. तिच्या एका हाताचा फटका दिपकच्या तोंडावर चांगलाच जोरात बसला. त्याच्या गडबडण्याचा फायदा घेऊन प्रिया कारच्या दुस-या दरवाज्याने बाहेर पडली. पण तोपर्यंत दिपकही कारच्या बाहेर आला होता.

"दिपक, तुला समजतंय का, तू काय करतोयंस ते?" ती जोरात ओरडली.

"तुझ्या आरडाओरड्याने इथे काहीच फरक पडणार नाही. ओरड किती ओरडायचं ते.” दिपक आसूरी हसत म्हणाला. बोलता बोलता त्याने आपल्या हिप पॉकेटमधे हात घातला आणि एक बटण चाकू बाहेर काढला.

“दिपक, पुढे येऊ नकोस. तिथेच थांब."

“असं? ठिक आहे. हे बघ प्रिया, माझ्याकडे दोन रस्ते आहेत. एक, मी आहे तिथेच थांबतो. तु पुढे ये किंवा दोन, मी पुढे येतो आणि....”

"शट अप!" ती पुन्हा ओरडली. तिने आजूबाजूला पाहिलं. ती झोपेत आहे असं पाहून दिपकने तिला कुठल्यातरी आडरानात आणलं होतं. मुसळधार पाऊस, असं आडरान आणि हातात चाकू घेऊन समोर उभा असलेला तो नराधम! आपल्यावर कोणता प्रसंग गुदरणार आहे, याची तिला कल्पना येऊन चुकली. संकटाच्या कल्पनेनच ती गर्भगळीत झाली.


ओअॅसिस ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्याf.

1 comment: