Saturday, July 25, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ६

प्रतिक्रिया: 
आरोपी नाशिकला रहात असताना, तिचे मनोज ठाकूर नावाच्या तरूणाशी प्रेमसंबंध होते. मनोज ठाकूर आणि प्रिया जगताप यांचे प्रेमसंबंध दोन वर्ष सुरळीतपणे सुरू होते. एके दिवशी अचानक मनोज ठाकूरने आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मनोज ठाकूरच्या कुटुंबियांकडून प्रिया जगतापवर एक केस दाखल करण्यात आली होती. मनोजला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटवून मग त्याला फसवल्याचा आरोप होता प्रियावर.

पण या केसमधून तिची निर्दोष सुटका झाली. मात्र प्रत्यक्षात आरोपी अतिशय चंचल वृत्तीची तरूणी आहे. नवनवीन तरूणांना आपल्या प्रेमजालात फसवणं आणि त्यांना आशेला लावून सोडून देणं हे कामच आहे आरोपीचं. मजोज ठाकूरचं आरोपीवर खरं प्रेम होतं पण आरोपी मात्र मनोजला खेळवत होती. काही दिवस मनोजला खेळवून झाल्यावर तिला त्याचा कंटाळा येऊ लागला. आता तिच्या मनात भरला होता तिच्याच घराशेजारी रहाणारा तरूण.... दिपक बागवे!

दिपक तर तिच्या गोड बोलण्याची भुरळ पडून कधीचाच वेडा झाला होता. अडचण होती ती मनोजची. एक दिवस आरोपीने मनोजला एकांतात गाठलं आणि त्याच्याशी संबंध तोडत असल्याचं सांगितलं. हळव्या मनाच्या मनोजसाठी हा मोठा आघात होता. तो प्रियाला काही बोलला नाही पण प्रियाशिवाय जगणं त्याच्यासाठी अशक्य होतं. साहजिकच त्याने आत्महत्या केली. मात्र मनोजच्या घरातील लोक गप्प बसले नाहीत. त्यांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीची केस दाखल केली. पण आरोपीचं नशीब बलवत्तर होतं.

मनोजच्या कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या केसमधून आरोपी निर्दोष सुटली. आता आरोपीचं दुसरं प्रकरण सुरू झालं होतं. दिपकसोबत! दिपकला मनोज ठाकूरच्या आत्महत्या प्रकरणाची पूर्ण कल्पना होती पण प्रियाला दोषी ठरवायला त्याचं मन तयार नव्हतं.

पुढे काही दिवसातच दिपकला मुंबईच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीमधून नोकरीसाठी बोलावणं आलं. दिपक नोकरीसाठी मुंबईला निघून आला. म्हणून प्रियानेही मुंबईच्याच ’कॉलइंडिया’ या कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं आणि तिच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, तिने ज्या कॉल सेंटरला नोकरीसाठी अर्ज केला होता, नेमकं त्याच कॉल सेंटरला दिपक ड्रायव्हर म्हणून पिक अप आणि ड्रॉपसाठी गाडी चालवत होता. प्रिया आणि दिपकच्या गाठीभेटीत पूर्वी जर काही अडथळा होताच, तर तोही आता दूर झाला.

दिपकच्या पाठोपाठ नोकरीसाठी मुंबईला आलेल्या प्रियाला मुंबई चांगलीच आवडली. इथलं राहणीमान, नोकरीमुळे हातात खेळणारा पैसा आणि स्वतंत्र आयुष्य याची तिला चटक लागली आणि आरोपीच्या चंचल वृत्तीने पुन्हा उचल खाल्ली. तिच्या लक्षात आलं की दिपकसारख्या फाटक्या तरूणावर प्रेम करण्यापेक्षा या शहरात कितीतरी देखणी आणि श्रीमंत मुलं आपल्याला मिळू शकतात. मग तिने आपला मोर्चा आपल्याच कॉल सेंटरमधील तरूण मुलांकडे वळवला.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment