Tuesday, July 28, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ९

प्रतिक्रिया: 
“युवर ऑनर, माझे सहकारी मित्र बॅ. नंदकिशोर खंदारे यांनी या खटल्याची पार्श्वाभूमी इतकी सुंदर सांगितली आहे की मला त्यांनाच विचारावंसं वाटतं की प्रास्ताविक मांडताना त्यांनी जी स्टेटमेंट्स केली आहेत, उदाहरणार्थ, प्रियाने असं ठरवलं, दिपकला असं वाटलं, प्रियाने हा विचार केला, हे सगळं त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं?”

“प्रास्ताविक मांडताना थोडेफार अंदाज करावेच लागतात.” बॅ. खंदा-यांनी उत्तर दिलं. समीरचा प्रश्न ऐकून त्यांच्या कपाळावर सुक्ष्म आठी पडली होती. बॅ. खंदा-यांचं उत्तर ऐकून समीरच्या चेहे-यावरचं हास्य एका क्षणात मावळलं.

“युवर ऑनर, केवळ पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनातून सरकारी वकील आरोपीच्या चारित्र्याबद्दल कोणताही अंदाज बांधून, त्या आधारे खुनाची पार्श्वृभूमी स्पष्ट करू शकत नाहीत. आरोपीच्या पूर्वायुष्यात जे काही घडलं होतं, त्याचा या खुनाशी संबंध नाही. तरीही जर सरकारी वकीलांना आरोपीच्या पूर्वायुष्याचा संबंध ह्या खुनाशी जोडायचा असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत. पण प्रास्ताविकातील त्यांचे अंदाज एका निष्पाप व्यक्तीबद्दल कोर्टाचं मन कलुषित करू शकतात आणि एका निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यात मदत करू शकतात याची त्यांना जाणीव असायला हवी.”

जज्ज सिन्हांनी बॅ. खंदा-यांकडे फक्त पाहिलं. खंदा-यांनी भुवया उडवून एक सुस्कारा टाकला.

बॅ. खंदारे नावाजलेले सरकारी वकील आहेत. मीही त्यांच्याकडून ब-याच गोष्टी शिकलो आहे. सरकारी वकीलांनी केलेले अंदाज आणि सत्य यात किती तफावत आहे हे दाखवण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरणं देतो.”

समीरने असं म्हटल्यावर बॅ. खंदारे कान टवकारून समीर काय म्हणतोय ते ऐकू लागले.

“सरकारी वकिलांच्या प्रास्ताविकानुसार आरोपीने स्वत:जवळ रामपुरी चाकू बाळगला होता आणि तोच चाकू तिने मयत दिपकच्या पाठीत खुपसला. प्रत्यक्षात दिपक बागवेचा खून ज्या चाकूने झाला तो रामपुरी चाकू नसून बटण चाकू आहे.”

समीरचं वाक्य संपलं आणि बॅ खंदारे मनातल्या मनात चरफडले. त्यांच्या बोलण्यातील चूक हेरून समीरने त्याचं बरोबर भांडवल केलं होतं.

“दॅट्स ऑल युवर ऑनर, “अंदाजांच्या आधारे प्रास्ताविकात लांबलचक भाषणं ठोकून कोर्टाचा वेळ घेणं मला आवडत नाही.” समीरने आणखी एक टोला हाणला.

कोर्टाला अभिवादन करून समीर खाली बसला. त्याने हळूच एक चोरटा कटाक्ष बॅ. खंदार्यां कडे टाकला. ते रागाने समीरकडेच पाहत होते. मोठ्या मेहनतीने त्यांनी भाषण तयार केलं होतं. पण त्यांचं भाषण म्हणजे केवळ टाईमपास होता असं अप्रत्यक्षरित्या म्हणून समीरने त्यांचा पार कचरा करून टाकला होता. त्यांच्या प्रास्ताविकाला काटशह देऊन समीरने त्यांचा आत्मविश्वाकस डळमळीत केला होता. त्याच्या परिणाम ते साक्षिदाराला विचारणार असलेल्या प्रश्नोत्तरांवर होणार होता आणि समीरला तेच हवं होतं. बॅ खंदा-यांनी आपला पहिला साक्षिदार बोलावला.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment