Saturday, July 25, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ५

प्रतिक्रिया: 
“किती लहान आहे ही!.... दिसायलाही चांगली आहे..... वय जास्तीत जास्त बावीस असेल हिचं.... हे काय वय आहे का, तुरूंगात जाण्याचं?.... काय वाढून ठेवलेलं असतं एकेकाच्या नशीबात!.... काय काय चालतं हल्ली कॉल सेंटरमधे..... अरे, हट्‍! हिचीच चूक असणार.....नाईट शिफ्टचा फायदा घेणा-या मुली काही कमी नाहीत....एवढी सुंदर मुलगी रात्रीची एकटी भेटली, तर कोण सोडेल?....”

केस ऐकायला आलेल्या लोकांच्यात प्रियाकडे पाहून दबक्या आवाजात अशी कुजबूज सुरू होती. प्रिया आरोपीच्या पिंज-यात उभी होती. तिच्यापर्यंत वाक्यं पोहोचत नसली तरी जमलेली लोकं काय चर्चा करत असणार याची तिला कल्पना आली होती. अगतिकतेमुळे तिच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. तिने हळूच मान वर करून समीरकडे पाहिलं. समीरही तिच्याचकडे पहात होता. तिची अवस्था त्याला समजली होती. त्याने तिला डोळ्याने खूण करून धिर देण्याचा प्रयत्न केला. समीर सरदेसाई प्रियाचा वकील होता. प्रियाने ’माझ्याकडे वकील नाही’ म्हणताच प्रियाचा वकील म्हणून समीरची नियुक्ती करण्यात आली होती.

घड्याळात अकराचा टोल पडला आणि जज्ज सिन्हांनी केस सुरू होत असल्याचं जाहिर केलं.

सरकारी वकील बॅ. नंदकिशोर खंदारे आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी कोर्टाला अभिवादन केलं. साडेपाच फूट उंची, कुरळे केस. पोपटाच्या चोचीसारखं किंचित बाक असलेलं नाक, त्यांच्या धूर्तपणाची साक्ष देत होतं. चौकोनी फ्रेमचा चष्मा डोळ्यांवर असला तरी त्यांच्या डोळ्यांमधील कावेबाजपणाची चमक लपत नव्हती. न्याय कुणाला मिळतो यापेक्षा आपलं केस जिंकणं जास्त महत्त्वाचं असतं, या विचारसरणीचा वकील होता तो. कोर्टाला अभिवादन करून बॅ. खंदार्यांमनी प्रिया आणि समीरकडे पाहून एक तुच्छ हास्य केलं आणि आपल्या प्रास्ताविकाला सुरूवात केली.

“युवर ऑनर, केस सुरू होण्याआधी मी या केसची पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडू इच्छितो म्हणजे जसजसे साक्षिदार समोर येतील तसतशी त्यांच्या साक्षीतून ही केस आपल्यासमोर स्पष्ट होत जाईल.

तसं पाहीलं तर ही केस एकदम साधी सोपी. नाईट शिफ्ट करून एक तरूणी ऑफिसच्या गाडीने घरी जात असताना, त्याच गाडीचा ड्रायव्हर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ड्रायव्हरपासून स्वसंरक्षण करण्याच्या प्रयत्नात त्या तरूणीच्या हातून त्या ड्रायव्हरचा खून होतो. वास्तविक पहाता अशा केसमधे त्या तरूणीला सहानुभूती आणि कायद्याच्या संपूर्ण पाठबळाची गरज आहे. पण या केसमधे परिस्थिती थोडी निराळी आहे.

आरोपीच्या पिंजर्याषत उभी असलेली तरूणी प्रिया जगताप हिची कोर्टात आरोपी म्हणून उभं रहाण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही तरूणी मूळची नाशिकची रहिवासी आहे. ‘घरच्या आर्थिक अडचणींमुळे आपण नाशिक सोडून मुंबईला नोकरी करण्यासाठी आलो,’ असं जरी तिने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं असलं, तरी खरं कारण निराळंच आहे.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment