Sunday, April 19, 2009

ओअॅसिस - पान ३२

प्रतिक्रिया: 
पान ३२


"हं काय? काहीतरी बोल ना!" देवदत्त म्हणाले.

"काय बोलू, देव? तू स्पष्टिकरण दिलंस. मी ते ऐकलं." मोहिनी म्हणाली.

"खरी परिस्थिती आहे ही. स्पष्टिकरण नाही," तिला आपलं म्हणणं पटलेलं नाही असं पाहून देवदत्त पुढे म्हणाले, "शेखर लहानपणापासून मला पाण्यात पाहातो. त्याच्याबाबतीत जरा कुठे खुट्ट झालं ना की मलाच जास्त टेन्शन येतं."

"का बरं?" मोहिनीने विचारलं.

देवदत्तांनी त्यांचे आणि शेखरचे लहानपणापासूनचे घडत आलेले किस्से मोहिनीला ऐकवले. मोहिनीने सर्व ऐकून घेतलं आणि मग ती म्हणाली, "अच्छा! म्हणजे थोडक्यात तुझ्या काकांना आपल्या मुलाचं वागणं पटत नाही म्हणून त्यांची त्याच्याबाबत सक्तीची भूमिका आहे पण शेखर याचं खापर तुझ्या माथ्यावर फ़ोडतो. शिवाय काकांची तुझ्यावर मर्जी असल्याने आगीत तेल पडतं ते वेगळंच."

"हं." देवदत्त म्हणाले.

"मग तू याबाबत कधी बोलला नाहीस का त्याच्याशी?"

"कसं बोलणार? त्याने त्याचा उलट अर्थ घेतला असता तर? एकतर मी काकांच्याकडे लहानाचा मोठा झालो. काही असो, काका-काकूने माझा कधीच दु:स्वास केला नाही. मग मी शेखरला छेडून उगाच तणाव का वाढवू?"

"अरे," समजावणीच्या सुरात मोहिनी म्हणाली ’बोल’ म्हणजे काही जाब विचारायचा नाही म्हणत मी. कधीतरी त्याच्या बाजूने सुद्धा विचार करायचास ना? काका त्याचे वडील असूनही, तुझ्याशी जसं वागतात, तसं त्याच्याशी वागत नाहीत... कसं वाटत असेल त्याला? तो काही सुरुवातीपासून वाईट वागत नसेल तुझ्याशी!"

देवदत्त एका नव्याच साक्षात्काराने मोहिनीकडे पाहायला लागले.

"यू आर राईट, मोहिनी. तो लहानपणी जेव्हा पहिल्यांदा माझ्याशी चिडून बोलला, तेव्हा काका त्याला भरपूर ओरडले होते. मी जर नंतर स्वत:हून पॅच-अप केलं असतं तर कदाचित इतकी वर्षं माझ्याशी तो असा वागलाही नसता. कदाचित आज परिस्थिती निराळी असती." मग एक क्षण थांबून देवदत्तांनी मोहिनीला विचारलं, "मी स्वार्थी आहे, असं तर वाटत नसेल ना, त्याला?"

मोहिनीने उत्तरादाखल, "बघ बुवा, तुलाच माहीत," अशा अर्थी फ़क्त खांदे उचकले. थंड हवेच्या झुळूकीने तिच्या केसाची एक बट अलगद तिच्या कपाळावर रूळली होती. चंद्रप्रकाशात तिचं ते रूप लोभसवाणं दिसत होतं. त्यावर देवदत्त तिला काहीतरी बोलणार एवढ्यात हॉटेलचा नाईट डयूटी मॅनेजर राउंडवर आला. त्या दोघांना बसून बोलताना पाहिलं तसा तो त्यांच्याजवळ आला आणि अदबीने वाकून म्हणाला, "सर, मॅम... जर तुम्हाला आणखी थोडा वेळ इथे बसायचं असेल तर, वुड यू लाईक टू हॅव समथिंग?"

देवदत्तांनी रिस्ट वॉच पाहिलं आणि ते मॅनेजरला म्हणाले, "नो थॅंक यू. वी विल लिव्ह इन फ़ाईव्ह मिनीट्स."

मॅनेजर "ओ.के., गुड नाईट" म्हणून निघून गेला. मग देवदत्त मोहिनीला म्हणाले, "मॅम, चला, पहाटेचे अडीच वाजत आलेयंत." 'पहाटे’वर मुद्दाम जोर देऊन देवदत्त म्हणाले.

मोहिनी त्यांच्याकडे पाहून तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मोकळं मोकळं हसली..
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्याl.

No comments:

Post a Comment